आजोबा!

वय असेल त्यांचे जवळपास 74 वर्ष, तसं बघायला गेलं तर फार जास्ती नाही, पण घुडगे दुखीमुळे त्यांच्याकडे बघितल्यावर वय अजून जास्ती आहे अस वाटतंय अशात! जन्म परभणी जवळच्या खेड्यात झालेला, ग्रॅज्युअशन चा काळ सोडला तर उर्वरीत आयुष्य परभणी मधलच! परभणी बद्दल सांगायचं झालं, तर मराठवाड्यातील एक जिल्हा, जगात जर्मनी,भारतात परभणी या विचित्र म्हणीमुळे प्रसिद्ध झालेला! लोकांचे मुळ व्यवसाय शेती किंवा goverment ची नौकरी! अश्या या छोट्या जिल्ह्यातील, माझे आजोबा हे अत्यंत धार्मिक, सुसंगत( consistent, कळेलच पुढे) आणि जिज्ञासू आहेत! माझे आजोबा, या विषयावर पहिली मध्ये निबंध लिहिताना आईला विचारलेला प्रश्न आठवतोय ” आई निबंधात आजोबां बद्दल काय लिहू ग? कसे आहेत आपले आजोबा? ” तुला कसे वाटतात ते लिही असं म्हणाली ती, तेव्हा काय लिहिल ते नाही आठवत, पण आता तेव्हपेक्षा नक्कीच खूप जास्ती लिहिता येईल त्यांच्या बद्दल!
आजोबा खूप जिज्ञासू आहेत,म्हणजे त्यांना जगाशी उप टू डेट राहायला आवडत. त्यामूळे घरात रोज दोन पेपर येतात, त्याशिवाय बरेच धार्मिक मासिकं, साप्ताहिक, पुस्तक आहेत. डोळ्यांचे एकदा operation झालेल असतानाही त्यांचा वाचण्याचा छंद काही कमी झालेला नाही! आजोबा बऱ्याचवेळा काहीतरी वाचतानाच आठवतात मला! मला जेव्हापासून आजोबा चांगले आठवतात तेंव्हापासून त्यांना खरंतर ऐकू येत नाही, त्यामुळे त्यांचा वयाच्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत त्यांचे संभाषण तसे कमीच आहे. मध्ये मी परभणीत असताना, त्यांनी मला जवळ बोलावले आणि इंटरनेट, मेल, फेसबुक , गूगल बद्दल प्रश्नावली सुरू केली, प्रश्न खूप बेसिक होते ह्या गोष्टी नक्की काय आहेत? असे काही! तसे बघायला गेलं तर इंटरनेट, कॉम्पुटर ह्या गोष्टी त्यांना नवीन नाहीत, पण त्यांचे वाढलेले उपयोग ह्या मुळे ते चकित झालेले होते! माझ सांगून झाल्यावर म्हणाले मला कॉम्पुटर शिकायचा आहे क्लास लावतो मी, मी रिटायरमेंटला आल्यावर नुकतेच कॉम्पुटर आले होते त्यामुळे माझा आणि त्याचा संबंध आलाच नाही! त्यांची या वयात, गुढग्यामुळे नीट चालता येत नसताना, ही नवीन technology शिकण्याची इच्छा बघून खरच एक वेगळाच आत्मविश्वास डेव्हलप झालाय माझ्यामध्ये! आजोबांना अमेरिकेतल्या “ट्रम्प” पासून ते आयुर्वेदातल्या वैदकशास्त्र बद्दल आणि पुराणातील ग्रंथाबद्दल सगळ्या गोष्टींचे न मोजता येणारे पण ९९ टक्के प्रश्न सोडवणार knowledge आहे! मध्ये त्यांना माझा स्वभावाबद्दल मी एक प्रश्न विचारला, उत्तर देऊन झाल्यावर म्हणाले “तुला काहिही प्रोब्लेम असला ना की मला विचारात जा!” वाक्य साधं वाटत असल तरी खूप काही देऊन गेलं, ते शब्दात सांगणं शक्य वाटत नाही! त्यांच्या अनुभवाचा जेवढा जमेल तेवढा फायदा सगळ्यांना व्हावा हा त्यांचा प्रयत्न पुष्कळदा दिसून येतो!
आजोबा हे खूप धार्मिक आहेत, यथासांग पुजा अर्चा हा त्यांच्या दिनक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे! देवाची पूजा एवढी का करायची? हा प्रश्न मी विचारला,अर्थात मला, माझा देवावर विश्वास नाही आणि देव नसतोच हे त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न होता, पण मला पटणारं समाधानकारक उत्तर त्यांनीच मला सांगितलं, म्हणाले- जगात तुम्हाला पुढे नेणारी एक positive शक्ती असते, मंदिरात किंवा पवित्र जागी ती जास्ती प्रमाणात असते, कारण सगळे लोक तिथे येऊन फक्त positive बोलतात आणि तिथे हे सगळे मंत्र पाठ ही मोठ्या प्रमाणात होतात, तसेच जर पाठ आपल्या घरात झाले तर ती शक्ती इथे पण डेव्हलप होईल आणि त्याचा फायदा तुम्हा सगळ्यांना होईल म्हणून माझ्या फावल्या वेळात मी ही पूजा करतो ! हे ऐकल्यावर पूजा का करायची? आणि देव आहे की नाही हा प्रश्न परत मला पडला नाही अजूनतरी!
कोणत्याही कामात consistency किती महत्वाची असते हे त्यांच्याकडे बघूनच शिकायला मिळालंय मला! त्यांचा दिनक्रम ठरलेला आहे लवकर उठणे, चालने, पूजा , जेवण, चहा यांचे टायमिंग फार फार तर एखाद्यावेळेस चुकते तेही सणावाराला! त्यांना कानाचा त्रास सुरू झाल्यापासून ते काही औषध घेतात आयुर्वेदिक! बऱ्याच गोळ्या आहेत, जेवण झाल्यावरचा कार्यक्रम असतो, गोळ्या घ्यायचा न चूकता, मला आठवतंय तेव्हापासून घेतायत ते, पण कधी विसरलेले आठवत नाहीत त्यामुळे त्यांची overall तब्येत ठणठणीत आहे,थोड फार वयोमानानुसार दुखणं सोडल तर बाकी सगळे शरीर निरोगी आहे! ती गोळ्यातली consistency जपल्यामुळे हे शक्य झालेय हे दिसून येत.
आजोबा नेहमीच माझ्या करिअर बद्दल विचारत असतात, बरेच प्रश्न विचारून नातू बरोबर वळणावर आहे की नाही याचा अंदाज ते घेत असतात! मित्र चांगले ठेव हा त्यांचा आवडता सल्ला, नेहमी नवीन मित्र बनवताना आठवतो आणि वेळीच सावध करतो! आजोबांना भेटल की दरवेळेस काहीतरी नवीन ऐकायला आणि शिकायला मिळत. त्यांना पडलेले technology चे प्रश्न आणि मला पडलेले विविध प्रश्न अश्या एकमेकांच्या प्रश्नांना उत्तर देत आमचा बॉण्ड मात्र खूप घट्ट झालाय हे नक्की!
-ऋग्वेद हट्टेकर

Leave a comment